कोल्हापूर : आम्ही वीजबिल भरणार नाही कृती समितीतर्फे आज (गुरुवारी) निघणाऱ्या वाहन रॅलीमुळे कोल्हापुरात चक्काजाम होणार आहे. या रॅलीत सायकल, दुचाकी, कार, ट्रक, बस, रिक्षा अशी जवळपास पाच हजारांवर वाहने सहभागी होणार असून, शहरातील प्रमुख मार्गावरुन ही रॅली जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता गांधी मैदान येथून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचा प्रारंभ होऊन दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर तिची सांगता होणार आहे.
लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीजबिले माफ करावीत, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिल भरणार नाही कृती समितीतर्फे कोल्हापुरात आंदोलन सुरु आहे. गेला महिनाभर याची तीव्रता वाढवत गल्लोगल्ली कोपरा सभा, महावितरणवर मोर्चे, आंदोलने करण्यात आली. मात्र, एवढे करुनही सरकार निर्णय घेत नसल्यानेच आता शेवटचा घाव घालण्यासाठी कोल्हापूरचे व्यवहारच काही काळ ठप्प करण्याची भूमिका जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांची रितसर परवानगी घेत शहरातील प्रमुख मार्गांवरुन वाहन रॅली काढून कोल्हापूरकरांचा उद्रेक काय असतो, हे दाखविण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. ही रॅली यशस्वी व्हावी यासाठी बुधवारी दिवसभर जनतेला आवाहन करत रिक्षा गल्लाेगल्ली फिरताना दिसत होत्या.
सकाळी साडेनऊ वाजता गांधी मैदानात महात्मा गांधी यांना अभिवादन करुन माजी खासदार राजू शेट्टी, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रताप होगाडे, सुभाष जाधव, निवास साळोखे, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, भगवान काटे, महेश जाधव यांच्यासह कृती समितीचे सर्व पदाधिकारी या रॅलीत सहभागी होणार आहेत. साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा होणार आहे. त्यानंतर १५ सदस्यीय शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीजबिल कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, सरकारने सक्ती करु नये, असे आवाहन करणारे निवेदन देणार आहे.
चौकट ०१
रॅलीचा मार्ग
गांधी मैदान ते खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, पापाची तिकटी, माळक़र चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, उमा टाॅकीज, शाहू मिल चौक, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, शाहूनाका, तावडे हॉटेल, कावळा नाका, स्टेशन रोडमार्गे असेंब्ली रोडवरुन जिल्हाधिकारी कार्यालय.