दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, अकरावी प्रवेश कसे करायचे, आदी प्रश्न अनेकांना पडले होते. शिक्षण विभागाने सीईटीच्या परीक्षेसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मक कौल दिला आहे. मात्र, ही सीईटी कोणत्या अभ्यासक्रमावर होणार, ऑनलाइन की ऑफलाइन असणार, किती गुणांची असणार, आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबत शासनाने लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे.
पॉंईटर
अकरावी प्रवेशाच्या जिल्ह्यातील जागा : ३५०००
महाविद्यालयांची संख्या : १५०
शहरातील जागा : १४६००
महाविद्यालयांची संख्या : ३५
चौकट
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीच्या गुणांच्या आधारे शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन, आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया होते. दहावीच्या मूल्यमापनावर तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया ठरणार असल्याचे शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. एम. एस. कागवाडे यांनी सांगितले. आयटीआयसाठी प्रवेश परीक्षा घ्यायची की, इयत्ता नववीच्या गुणांवर प्रवेश द्यायचा याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची सध्या चर्चा सुरू असल्याचे कोल्हापुरातील शासकीय आयटीआयचे प्राचार्य आर. एस. मुंडासे यांनी सांगितले.
चौकट
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार?
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शाळांनी घेतलेल्या पूर्व, तोंडी परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार असल्याचे वाटत होते. मात्र, अद्याप अंतर्गत मूल्यमापन कसे होणार हे शिक्षण विभागाकडून स्पष्ट झालेले नाही.
चौकट
ऑनलाइन सीईटी झाली, तर ग्रामीण भागाचे काय?
सीईटी परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा निर्णय झाला,तर ती शहरात घेणे शक्य आहे. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या अडचणीमुळे परीक्षा देता येण्याची शक्यता कमी आहे.
चौकट
ऑफलाइन झाली, तर कोरोनाचे काय?
कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यासाठी राज्य शासनाने दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द केली. त्यामुळे सीईटी ऑफलाइन घेतल्यास कोरोनाचे काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.
प्राचार्य, शिक्षक म्हणतात?
या सीईटीबाबत सद्यास्थिती पालक, विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था आहे. सीईटीचे स्वरूप, अभ्यासक्रम, गुण, आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा.
-पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज
दहावीची परीक्षा रद्द झाली. मात्र, अकरावी प्रवेशासाठी कोरोना कमी झाल्यावर सीईटी घेतली पाहिजे, असे मला वाटते. तिचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असावेत. शंभर गुणांसाठी एमसीक्यू प्रश्न असावेत.
-आर.पी. लोखंडे, प्राचार्य, महावीर महाविद्यालय.
सद्य:स्थितीत सीईटी घेणे शक्य होणार नाही. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मूल्यमापन, सीईटीबाबत शासनाने स्पष्ट आदेश देणे आवश्यक आहे.
-राजेश वरक, माध्यमिक शिक्षक, महाडिक कॉलनी