कोल्हापूर : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी दुर्योधनाची फौज निर्माण केली असून समोरच्याचे चूक की बरोबर समजून न घेता त्यास घेरून मारत आहेत. लाल किल्ला ते संसदेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याची घणाघाती टीका एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रवीशकुमार यांनी शनिवारी येथे केली.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवनात ऑनलाईन व्याख्यानात ‘भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर होते. हे व्याख्यान ऐकण्यास लोकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर, कार्यपद्धतीवर रवीशकुमार यांनी तासभराच्या भाषणात सडकून टीका केली.
रवीशकुमार म्हणाले, आज केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याला कोणत्याही चौकशीविना तुरुंगामध्ये टाकले जाते. प्रत्येक गोष्टीला सत्ताधाऱ्यांनी धार्मिक ओळख दिली आहे. ही ओळख म्हणजे गुलामगिरी आहे. सर्वसामान्यांनी ती समजून घेणे आवश्यक आहे. ही मंडळी खोटे बोलतानाही धर्माचा, देवदेवतांचा आधार घेत आहेत. पंतप्रधान लाल किल्ला ते संसदेपर्यंत खोटे बोलून रेटून नेत आहेत. प्रत्येक बाब फिरवून फिरवून सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनातही सरकारने विरोधी विचार संपविला. दिवसांमागून दिवस गेले. त्यात सरतेशेवटी आंदोलकांचा आवाज सरकारने दाबला आहे. दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर चक्क खिळे ठोकले. याच शेतकऱ्यांची मुले सीमेवर जवान म्हणून देशाच्या संरक्षणासाठी प्राण हातात घेऊन तैनात आहेत. त्यांनाच अतिरेकी म्हणून संबोधले. ही बाब साऱ्या जगाने पाहिली. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विरोधी बोलण्याचा आवाज या सरकारने दाबला आहे. मात्र, त्यांना केरळ, तमिळनाडू, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशात हे करता आलेले नाही. सत्ताधाऱ्यांना त्यांच्याविरोधात बोललेले सहन होत नाही. संसदेतील बहुमताला त्यांनी गँगमध्ये रूपांतरित केले आहे. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबला जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर म्हणाले, ही लढाई पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, आर.एस.एस. या प्रवृत्तींविरोधात आहे. हे आंदोलन प्रतिगामी शक्तीविरोधात आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या लोकशाहीची मूल्ये जपतानाच झाल्या आहेत. सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचे हे काम आहे. काश्मीरमध्येही असाच आवाज दाबला जात आहे.
यावेळी उमा पानसरे, मुकुंद भट, अरुण नरके, व्यंकाप्पा भोसले, पांडुरंग लवटे, चिंतामणी मगदूम यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन झाले. मेघा पानसरे यांनी पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने पुन्हा एकदा तपास कुठपर्यंत आला आणि कटकारस्थान करणाऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार हे स्पष्ट केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. या सभेत मुक्ता दाभोलकर, ॲड. अभय नेवगी, कविता लंकेश, आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले.
चौकट
बदल जरूर होईल..
लोकशाहीची ओळख संविधानामधून होते. महाराष्ट्रातील लोकांनी मला त्याच्या प्रती दिल्या. तीच मंडळी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुढे का येत नाहीत? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भीमगीतांमधून जगासमोर आणले. त्यातून लोकशाहीची मूल्ये जपली आहेत. असे विचार एकत्रित आले की बदल नक्की घडू शकतो. त्यासाठी काही काळ लागेल. मात्र, हे विचार जरूर बदलतील, असा विश्वासही रवीशकुमार यांनी व्यक्त केला.
मैदानावर मोठा बंदोबस्त
रवीशकुमार यांची ऑनलाईन, तर कन्हैयाकुमार यांची दसरा चौकात थेट सभा होणार होती. मात्र, कन्हैयाकुमार यांच्या सभेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली. तरीसुद्धा पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
फोटो : २००२२०२१-कोल-पानसरे स्मृतिदिन
ओळी : कोल्हापुरात ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठानतर्फे शनिवारी शाहू स्मारक भवनात जागर सभा झाली. त्यावेळी पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन उमा पानसरे व मुकुंद भट यांच्या हस्ते झाले. यावेळी अरुण नरके, व्यंकाप्पा भोसले, पांडुरंग लवटे, चिंतामणी मगदूम, मेघा पानसरे, आदी मान्यवर उपस्थित होते. (आदित्य वेल्हाळ)
फोटो : २००२२०२१-कोल-पानसरे
कोल्हापुरात ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या जागर सभेत एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रवीशकुमार यांनी विचार मांडले.
फोटो : २००२२०२१-कोल-पानसरे स्मृतीदिन ०२
आेळी : कोल्हापुरात ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाहू स्मारक भवनात श्रमिकतर्फे शनिवारी आायोजित केलेल्या जागर सभेत ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
(सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)