- व्यवहारावर परिणाम
रमेश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: कोरोनामुळे सध्या तरी बँकांच्या सेव्हिंग खात्यात कमी आणि स्वतःजवळ जास्त रोख रक्कम ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र आहे. यामध्ये नोकरदार आणि सर्वसामान्य लोकांची संख्या जास्त आहे. तसेच सध्या बँकांत रोख रकमेचा भरणाही व्यापार-उद्योग थंडावल्याने ४० ते ५० टक्क्यांनी घटला आहे. अशी माहिती बँक वर्तुळातून देण्यात आली.
कोरोनामुळे सतत वाढत जाणारा लॉकडाऊन, कमी वेळेत होणारी बँकांतील गर्दीची धास्ती आणि अचानक गरज भासल्यास पैसे आणायचे कोठून या सततच्या भीतीमुळे रोख रक्कम जवळ ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तसेच पैशाची गरज आहे, बँकेत खात्यावर पैसे आहेत. परंतु ते काढायला बँकेत जायचे असेल तर चौकात पोलीस अडवतील ही भीतीसुद्धा मनात कायम आहे. त्यामुळे बँकेत पैसे भरण्याकडे लोकांचे काहीसे दुर्लक्ष होत आहे. जास्तीत जास्त रक्कम जवळ बाळगण्याकडे लोकांचा कल सध्या तरी आहे. काही जण एटीएममधूनही पैसे काढत आहेत. त्याचे प्रमाणही जास्त आहे.
बहुतेक नोकरदारांचे पगार बँकेच्या खात्यावर जमा होतात. गरजेनुसार ही रक्कम काढली जाते; परंतु सध्या कोरोनामुळे ही रक्कम एका दमातच विड्रॉल करून काढून घरी ठेवली गेली जात आहे. त्यामुळे त्याचाही बँकेवर परिणाम झाला. सध्या व्यापार-उद्योगही तसा बंद अवस्थेतच आहे. यापूर्वी व्यापारी वर्ग दिवसभरात झालेल्या व्यापाराचा भरणा दुसऱ्या दिवशी बँकेत भरत असत. पण सध्या व्यापारी वर्ग ही बँकेत दररोज भरणा करत नसल्याचे चित्र आहे. तीन-चार दिवसातून एकदा ते बँकांत पैसे भरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराच्या ५० टक्केच रक्कम बँकेत जमा होत असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.
चौकट:
बँकेच्या सर्वच व्यवहारावर परिणाम...
सध्या कोरोनामुळे बँकांच्या कामकाजाची दैनंदिन वेळ कमी करण्यात आली आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेतंच कॅश ट्रांजेक्शन होत आहे. कर्ज देणेही बंद आहे. या सर्व गोष्टींचा बँकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. शिवाय रोख रक्कम भरण्याचे प्रमाणही घटले आहे.
..........
चौकट:
जवळ ठेवलेली रक्कम कोट्यवधींच्या घरात...
कोरोना काळात रोख रक्कम जवळ ठेवण्याचे लोकांचा कल जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु अशी रक्कम लोकांकडे किती असेल या रकमेचा अंदाज बांधता येत नाही. तरीही ही रक्कम काही कोटींच्या घरात असू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
.............................................