लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काेरोना संसर्गापासून बचाव करणारी लस सर्वच घटकांसाठी अत्यंत सुरक्षित आहे, त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत त्यामुळे महिला मासिक पाळीच्या दरम्यान देखील घेऊ शकतात, असा निर्वाळा स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे. गर्भवती महिलांबाबत मात्र मतमतांतरे असल्याने अद्याप यापैकी कोणालाही लस देण्यात आलेली नाही.
सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत असून आता तो ज्येष्ठांकडून मध्यम वयोगटातील नागरिकांकडे सरकला आहे. त्यामुळे आता १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांनीदेखील लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असताना मासिक पाळीमध्ये महिला-मुलींनी लस घेऊ नये, असे मेसेजेस समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या कालावधीत लस घेतली की प्रतिकारशक्ती कमी होते, जास्त त्रास होतो, आजारपण येते अशा काही अफवा पसरवल्या गेल्या. यासह गर्भवतींनीही लस घेऊ नये, अन्यथा जन्मणाऱ्या बाळावर विपरीत परिणाम होतो, असे सांगितले जात होते.
याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वरील सगळ्या अफवा असून महिला-मुलींनी मनात कोणतीही शंका न ठेवता लस घ्या, असे सांगितले. लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला तिच्या तब्येतीनुसार अंग दुखणे, ताप येणे, कणकण वाटणे, अशक्तपणा असे त्रास जाणवू शकतात; पण हे कमी अधिक प्रमाणात सर्वांच्याच बाबतीत होतं त्याचा मासिक पाळी आणि लसीचा कोणताही संबंध नाही.
--
गर्भवतींबाबत मतमतांतरे
गर्भवतींच्या लसीकरणाबाबत फारसे संशोधन झालेले नाही किंवा तसा डेटा उपलब्ध नाही. परदेशांमध्ये गर्भवती राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत असेल तर तिने तातडीने लस घ्यावी, अन्यथा तीन ते पाच महिन्यांनी घेतली तरी चालेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे; पण त्यांना सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे अजून गर्भवतींना व स्तनदा मातांना ही लस देण्यात आलेली नाही.
---
परदेशांमध्ये फायझरची लस गर्भवतींना देण्यात आली होती, त्यात संशोधकांना त्यांच्यामध्ये फार काही बदल झाल्याचे आढळले नाही. स्तनदा मातांनी मात्र लस घेतली तर चालते, कारण लसीमुळे तयार होणारे ॲन्टीबॉडीज दुधामार्फत बाळाच्याही शरीरात जाऊन त्याचीही रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डॉ. नीता कुडाळकर
---
मासिक पाळीत लस घेऊ नये, प्रतिकारशक्ती कमी होते अशा अनेक अफवा पसरल्या आहेत. मात्र, यातल्या कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. महिलांनी न घाबरता या काळात लसीकरणासाठी तुमचा नंबर आला असेल लस घ्यावी.
डॉ. मंजुळा पिशवीकर
---
मासिक पाळीतदेखील लस तितकीच सुरक्षित आहे. गर्भवतींबाबत मात्र फारसे संशोधन झालेले नाही. पाचव्या महिन्यानंतर ठरावीक पद्धतीची लस घ्यावी, असे सांगण्यात आले आहे; पण अजून आपल्याकडे त्याची सुरुवात झालेली नाही.
डॉ. भारती अभ्यंकर
--
डमी पाठवली आहे.