कोल्हापूर : क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम विकास प्रकल्प आणि पशुआरोग्य इन्स्टिट्युटच्या वरिष्ठ संशोधक डॉ. सी. यामिला माटिर्नेझ झुबियॉर आणि प्रकल्प तज्ज्ञ दिलॅदिस युझ बासिर्नेझ यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी पुष्पगुच्छ, विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि शाहू चरित्रग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत केले.झुबियॉर या पश्चिम महाराष्ट्रातील रेशीम विकास उपक्रमांना भेट देऊन माहिती घेण्यासाठी आल्या आहेत. आज दुपारी त्यांचे विद्यापीठात आगमन झाले. विद्यापीठात रेशीम उत्पादनाविषयी महत्त्वपूर्ण संशोधन सुरू असल्याचे पाहून आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमार्फत करण्यात आलेली तुतीची लागवड आणि त्यांच्या प्रकल्पांना येत असलेले यश पाहण्यासाठी आणि त्या पद्धतीने क्युबन शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न हा अभ्यासदौऱ्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्यासह प्राणिशास्त्र अधिविभागाचे डॉ. ए. डी. जाधव, उपकुलसचिव बी. बी. पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, झुबियॉर यांनी गडहिंग्लज येथील रेशीम उत्पादन व विकास केंद्राला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात केली. पाच दिवसीय दौऱ्यात त्या सांगली सातारा व वाई येथील रेशीम उत्पादकांचा भेटी वस्त्रोद्योग व रेशीम विभागाच्या सहसचिवांशी चर्चा करणार आहेत.
सी. यामिला माटिर्नेझ झुबियॉर : क्युबियन अधिकाऱ्यांची विद्यापीठाला भेट
By admin | Updated: November 30, 2014 23:56 IST