कोल्हापूर : दुरुस्तीसाठी आणलेल्या सिलिंडरमधील क्लोरिन गॅसच्या गळतीमुळे शिवाजी उद्यमनगरमध्ये मंगळवारी हाहाकार उडाला होता. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी सुबीर अत्तार याच्याकडे चौकशी केली असता त्याने ते क्लोरिन गॅसचे सिलिंडर सात ते आठ वर्षांपूर्वी भंगाराच्या दुकानातून खरेदी केले आहे. दिवाळीमध्ये फुगे फुगविण्यासाठी त्याचा वापर करणार होतो. त्यासाठी ते दुरुस्तीसाठी भोई-कांबळे यांच्या कारखान्यात आणल्याची कबुली दिली. दरम्यान, हवेत पसरलेला वायू पूर्णपणे नष्ट झाला असून, परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी कांता बांदेकर व तानाजी कवाळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेला कारखाना मालक प्रशांत सर्जेराव भोई-कांबळे (वय ४०, रा. उद्यमनगर), सुबीर अत्तार (३०, रा. बिंदू चौक), सूरज खाडे (३५, रा. उद्यमनगर) यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. गॅस सिलिंडर पोलिसांच्या ताब्यात आहे. शिवाजी उद्यमनगर येथील एस. एस. एंटरप्रायजेस या वेल्डिंग कारखान्यात ही गॅस गळतीची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये गुदमरून लक्ष्मीबाई पांडुरंग माने (६५) या वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी सीपीआरमध्ये आक्रोश करत निष्काळजीपणे गॅस सिलिंडर हाताळणाऱ्या कारखाना मालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रशांत कांबळे, सुबीर अत्तार, सूरज खाडे या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता सुबीर अत्तार याने आठ ते दहा वर्षांपूर्वी हे सिलिंडर कोल्हापुरात भंगाराच्या दुकानातून खरेदी केले आहे. दिवाळी तोंडावर आल्याने त्यामध्ये फुग्यामध्ये भरणारा गॅस भरण्यासाठी भोई-कांबळे याच्या कारखान्यात सिलिंडर घेऊन आला होता. सिलिंडरमध्ये गॅस आहे तो कोणता आहे, याची कल्पना दोघांनाही नव्हती. कांबळे हा सिलिंडर दुरुस्त करताना त्याचा स्फोट होऊन गळती लागल्याने दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
‘त्या’ गॅस सिलिंडरची भंगारातून खरेदी
By admin | Updated: November 5, 2015 00:45 IST