लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : मागील वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सामना करत घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागत असल्याने ते न परवडणारे आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन येथील भारतीय जनता पार्टीने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, शासनाने फक्त शनिवार व रविवारी लॉकडाऊन होईल, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा बदल करून बुधवारी अचानक सर्व दुकाने, व्यवसाय बंद करायला लावल्याने व्यापाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊन असाच राहिल्यास जनता रस्त्यावर उतरेल. यापेक्षा नियम व अटी पाळण्याबाबत जागृती व लसीकरण करून व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.