कोल्हापूर : पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी न्यू हायकर्स ग्रुप, कोल्हापूरतर्फे आयोजित पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेत देशातील ४७८ शिवभक्तांनी सहभाग नोंदविला. मोहिमेत विविध झाडांच्या एक लाख बियांचे रोपण करण्यात आले.सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते शिवा काशीद यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. शिवरत्न शेटे यांनी पावनखिंड रणसंग्रामाविषयीची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे पूजन खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मोहिमेस प्रत्यक्षात सुरुवात झाली. पहिला मुक्काम खोतवाडी येथे, तर दुसरा मुक्काम पांढरेपाणी येथे झाला. तिसऱ्या दिवशी पावनखिंड येथे खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, डॉ. शिवरत्न शेटे, आदी मान्यवरांच्या हस्ते पावनखिंडीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. शिवरत्न शेटे यांनी वीररस भाषेत पावनखिंड रणसंग्राम इतिहास उपस्थितांना सांगितला. त्यानंतर शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडे सादर केले. त्याचबरोबर बोरवडे (ता. कागल) येथील मार्शल आर्टच्या खेळाडूंनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ग्रुपतर्फे मोहिमेदरम्यान शाळांना आर्थिक आणि शालेय साहित्याची मदत करण्यात आली. मोहिमेचे नेतृत्व ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी केले. मोहिमेत अरविंद मेढे, रामदास पाटील, तुषार कामत, सचिन भोसले, दादासाहेब कांबळे, सुचित हिरेमठ, विनायक जरांडे, उमेदसिंग रजपूत यांच्यासह शिवभक्त सहभागी झाले होते. ६० वर्षांच्या सुश्मा परुळेकर यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. (प्रतिनिधी)
पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा
By admin | Updated: July 18, 2014 00:50 IST