नाना जाधव
भादोले : वारणा नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील लोक नदीपात्रात ये-जा करीत; मात्र चांदोली धरण झाल्यानंतर नदी बारमाही दुथडी भरून वाहू लागल्यापासून अनेक वर्षे ये-जा बंद झाल्याने नदीच्या पलीकडे गावातून नदीवर पूल व्हावा, अशी मागणी आहे. प्रलंबित मागणीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कोरेगाव (ता. वाळवा) ते कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले (हातकणंगले) या दरम्यान नवीन पुलाच्या कामाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कोरेगाव, फार्णेवाडी, ढवळी, नागाव, पोखर्णी, भडकंबे, बहादूरवाडी, बावची, गोटखिंडी या आडमार्गावर असणाऱ्या गावांसाठी वारणा नदीवर पूल होण्यासाठी कोरेगावचे दिलीप पाटील, कृष्णात हिंदूराव पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. लोकांच्या मागणीची दखल घेऊन या मतदारसंघाचे आमदार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी सूचना दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भादोले-कोरेगावच्या दरम्यानच्या वारणा नदीवरील पुलाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. वारणा नदीत या पुलासाठी सुमारे २५ कोटी रु. खर्च येण्याची शक्यता आहे. नदीच्या पलीकडील कोरेगावसह अन्य गावांतील लोकांना किणीमार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे, तर भादोलेमार्गे वडगावकडे जाता येणार असून दहा ते पंधरा किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
१५ भादोले
वारणा नदीपात्रावर कोरेगाव-भादोलेदरम्यान होणाऱ्या नवीन पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.