कोल्हापूर : न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुरेश रामचंद्र लोहार (बक्कल नंबर १२६०), (वय ४८, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर) याला शुक्रवारी विशेष सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांनी दीड वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गतवर्षी ११ जून २०१४ रोजी दसरा चौक येथे ही लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले होते.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आमशी (ता. करवीर) येथील संशयित सुनील राजाराम पाटील याच्यावर करवीर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल होता. याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश मस्के यांनी करून संशयित सुनीलला अटक केली होती. सुनीलचे काका बाजीराव तुकाराम पाटील यांनी पोलीस नाईक सुरेश लोहार याच्याशी संपर्क साधला. लोहार याने तुमच्या पुतण्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्याचे काम माझ्याकडे आहे. ते लवकर पाठविल्यास पुतण्यास लवकर जामीन मिळेल, असे बाजीराव पाटील यांना सांगितले. त्यावर त्यासाठी काय तडजोड करायची, असे पाटील यांनी लोहार याला विचारले. लोहार याने २० हजार रुपये द्या, न्यायालयात लवकर दोषारोपपत्र पाठवितो, असे सांगितले. त्यानंतर उद्या फोन करून या, असे लोहारने सांगितले. बाजीराव पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. त्यानुसार सुरेश लोहारला लाच घेताना पकडले होेते. सरकार पक्षातर्फे अॅड. ए. एम. पीरजादे यांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेला पुरावा ग्राह्य मानला.बाजीराव पाटीलची लोहारला मदतया खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. मूळ फिर्यादी बाजीराव पाटील यांनी सरकार पक्षाला मदत केली नाही. उलटपक्षी आरोपीस मदत होईल, अशा स्वरूपाची साक्ष न्यायालयात दिली. या परिस्थितीमध्येही सरकारी पक्षाला त्याचा उलटतपास घेणे भाग पडले. त्यामध्ये करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिवाजी मस्के यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. हा खटला चालविण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अंतिम मंजुरी दिली. त्यांचीही साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
लाचप्रकरणी पोलिसाला दीड वर्षे शिक्षा
By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST