कोल्हापूर : कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच, त्यानंतर उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी शनिवारी (दि. १३) होणाऱ्या केंद्रीय महालोक अदालतीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय आज, गुरुवारी कोल्हापूर जिल्हा पक्षकार महासंघाच्या मेळाव्यात घेतला. महासंघाचे निमंत्रक पद्माकर कापसे, प्रसाद जाधव व सुरेश गायकवाड यांनी पक्षकारांची भूमिका स्पष्ट केली. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे हा मेळावा झाला.पद्माकर कापसे म्हणाले, कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी गेल्या २० ते २५ वर्षांपासून येथील वकीलबांधव व पक्षकार लढा देत आहेत. गतवर्षी या प्रश्नासाठी वकिलांनी ५८ दिवस विविध मार्गांनी आंदोलने करून सरकारला जागे केले. यावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी, या प्रश्नासाठी त्रिसदस्यीय समिती नेमून ३१ जानेवारी २०१४ पर्यंत यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते; पण अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. आमदार राजेश क्षीरसागर हे उद्या, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कोल्हापूर खंडपीठ प्रश्नासंदर्भात बोलणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे मंगळवारी (दि. १६) दिल्ली येथे केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांना भेटून बैठक घेणार आहेत.प्रसाद जाधव म्हणाले, कोल्हापूर खंडपीठ प्रश्नासाठी अग्रेसर राहू. त्यासाठी निश्चितच वकीलबांधवांना बळ देऊ. यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू.याप्रसंगी शामराव चिंचवणे (रुकडी), एन. एन. पाटील, सुशीला नागवेकर, तुकाराम साजणीकर या पक्षकारांनी, उच्च न्यायालयात जाण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी किती वेळ खर्चिक होतो, हे सांगितले.यावेळी माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, जयदीप शेळके, उदय लाड, किशोर घाटगे, वसंतराव मुळीक, संग्राम पाटील, सलीम पाच्छापुरे, भगवान काटे, वैभव राजेभोसले, आप्पा लाड, कोल्हापूर जिल्हा वकील बार असोसिएशनचे सचिव राजेंद्र मंडलिक, माजी अध्यक्ष अॅड. शिवाजी राणे, अॅड. अजित मोहिते, अॅड. बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षकार उपस्थित होते.
उद्याच्या महालोक अदालतीवर बहिष्कार
By admin | Updated: December 12, 2014 00:07 IST