कोल्हापूर : ससांगली-कोल्हापूर रस्त्यावर मजले (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत रात्रीच्या वेळी प्रवासी दाम्पत्यास पाठलाग करून लुटणाऱ्या दोघा लुटारुंना सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी तौफिक ताजुद्दीन मुल्ला (वय ३०), मन्सूर अबुबकर शेख (२७, दोघे रा. सोलगे मळा, सांगली नाक, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कॅमेरा, इलेक्ट्रिक शेगडी, मोबाईल यासह मोटारसायकल असा सुमारे एक लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, मजले गावच्या हद्दीत सांगली-कोल्हापूर रस्त्यावर दि. २२ आॅगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवरून पाठलाग करून प्रवासी दाम्पत्यास अडवून त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेत पोबारा केला होता. याप्रकरणी संबंधित दाम्पत्याने हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते व त्यांचे सहकऱ्यांनी याप्रकरणी गोपनीय माहिती मिळविली असता तौफिक मुल्ला व मन्सूर शेख यांची नावे समजली. त्यानुसार पथकाने सोमवारी दुपारी सांगली नाका, इचलकरंजी येथे सापळा लावून या दोघांना मोटारसायकलवरुन जाताना पकडले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
प्रवासी दाम्पत्यास लुटणाऱ्या दोघांना अटक
By admin | Updated: September 15, 2015 01:24 IST