आजरा : वाचनाने माणूस शहाणा होतो. कारण पुस्तकच मस्तक घडवतात आणि मस्तक घडलेली माणसंच देश आणि समाज घडवतात, असे प्रतिपादन कादंबरीकार बी. एम. कामत त्यांनी केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन बी. एम. कामत यांच्या व्याख्यानाने झाले. प्र. प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते. कामत म्हणाले, वाचन संस्कृती वाढली पाहिजे. बदलत्या वातावरणात जगताना पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणूनच पुस्तकांना आपले मित्र बनवले पाहिजे. विद्यार्थीदशेतच कष्ट करण्याची सवय ठेवली, तर व्यक्तिमत्व विकास नक्कीच होतो.
भाषा समृद्ध करण्यासाठी निरीक्षणशक्ती वाढवली पाहिजे. आपल्या सर्जनशीलतेचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. कारण मनातील चांगले विचारच सर्जनशीलतेला चालना देतात.
यावेळी प्र.प्राचार्य डॉ. सादळे, उपप्राचार्य राजीव टोपले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास नाईक यांची भाषणे झाली. डॉ. आनंद बल्लाळ यांनी स्वागत केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी अतिथी परिचय करून दिला. प्रा. सुषमा पारकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुवर्णा धामणेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अशोक बाचूळकर, प्रा. रूपाली फोंडकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी : आजरा महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमात कादंबरीकार बी. एम. कामत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अशोक सादळे, डॉ. आनंद बल्लाळ आदी उपस्थित होते.
क्रमांक : १७०१२०२१-गड-०२