कोल्हापूर : येथील शाहू जकातनाक्याजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्टार चिकन सिक्स्टीफाईव्हच्या गाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्याच्या आवाजाने तो परिसर दणाणून गेला. एवढा मोठा आवाज नेमका कशाचा आला हे न समजल्याने लोकांमध्ये भीती पसरली. या स्फोटात चिकनची गाडी चालविणारा व त्याचा मित्र हे दोघे जखमी झाले. बॉम्बमध्ये एक विशिष्ट प्रकारचे सर्किट, बॉल-बेअरिंग, छर्रे, वाळू, आदी साहित्यांचा वापर केला होता. त्यातील छर्रे गाडीमालकाच्या तोंडास व हाताला लागले आहेत. गणेशोत्सव आठवड्यावर आला असताना हा स्फोट झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. हा स्फोट नेमका कोणत्या कारणांवरून झाला असावा यासंबंधीची माहिती अजून स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.या स्फोटात श्रीधर मारुती कोठावळे (वय २२, रा. दादू चौगलेनगर, उजळाईवाडी) व मनोज विनायक परब (२३, रा. टेंबलाईवाडी) हे जखमी झाले. त्यांना पोलिसांनी गाडीतून चौकशीसाठी नेले. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. नंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ‘शाहू जकातनाक्याच्या कागलकडील बाजूस उज्ज्वल को-आॅप. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच बबलू याचे गॅरेज व चिकन सिक्स्टीफाईव्हची गाडी आहे. तो दिवसभर गॅरेज सांभाळतो व सायंकाळनंतर तिथेच गाडीवर दोन-तीन तास चिकन विकतो. रोजच्याप्रमाणे आजही तो सहा-सव्वासहाच्या सुमारास तिथे आला. तेव्हा त्यास चिकनच्या गाडीवर पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये काहीतरी भरून ठेवल्याचे लक्षात आले. त्याला ही गाडी पुढे घ्यायची होती. त्यामुळे काहीतरी असेल म्हणून त्याने तो बॉक्स उचलताच त्याचा जोरदार स्फोट झाला. काही कळायच्या आतच ही घटना घडली. त्याचा प्रचंड मोठा आवाज ऐकून परिसर दणाणला. लोकांत भीतीचे वातावरण पसरले. रस्त्यावरील ट्रकचा टायर फुटला, की गॅस सिलिंडरचा स्फोट झाला म्हणून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तो गावठी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी त्यातील छर्रे, वाळू, काचा विखुरलेल्या स्थितीत पडलेल्या होत्या. स्फोटात गाडीचे फारसे नुकसान झाले नसले, तरी छर्रे लागून दोघे जखमी झाले. त्याच्यासोबत असलेल्या मित्राकडे गॅस सिलिंडर होते. सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही. स्फोटातील छर्रे लागून सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. घटनेची माहिती पोलिसांना समजताच काही वेळातच गोकुळ शिरगाव व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट
By admin | Updated: August 24, 2014 01:31 IST