कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या विकासकामांना लागणारी महानगरपालिकेची बोगस ‘एनओसी’ देणारी एक टोळी कार्यरत असून, त्यामुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावरील निधी मनपाच्या संमतीविना खासगी जागेत खर्च झाल्याचा आरोप महानगरपालिकेच्या सभेत गुरुवारी झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित टोळीचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. राज्य अथवा केंद्र सरकारच्या योजनांतून मिळालेल्या निधीतून शहरात विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येतात. त्यासाठी कोणती कामे करावीत, निधीचा योग्य वापर व्हावा या हेतूने त्या कामासाठी मनपा प्रशासनाची ‘एनओसी’घेतली जाते; परंतु गेल्या दहा वर्षांत अनेक कामांसाठी अशी ‘एनओसी’ न देताच कामे झाली आहेत; परंतु या कामांसाठी बोगस एनओसी दिली आहे. ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. बांधकाम विभागातील एक टोळीच अशी बोगस एनओसी देत आहे. अधिकाऱ्यांच्या सह्णा बोगस आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी प्रा.जयंत पाटील यांनी केली. हा एक नवीन घोटाळा असल्याने त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी निशिकांत मेथे यांनी केली तर संबंधितांवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न आदिल फरास यांनी विचारला.रंकाळ्याचा डीपीआरव्यवस्थित करावा राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलावाचा १२७ कोटींचा डीपीआर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा ठराव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी या विषयावर झालेल्या चर्चेत तलावाचा डीपीआर चुकीचा झाला असून, तो कार्यालयात बसून तयार केल्याचा आक्षेप घेण्यात आला. परिसरात नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पार्किंगची सोय व्हावी, एक चांगले पर्यटनकेंद्र व्हावे यादृष्टीने विकास करावा, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. जॉगिंग व सायकलिंग, पदपथ, करमणुकीची साधने, बगीचा विकसित करण्याच्या कामांचा त्यामध्ये समावेश करावा, असे राजेश लाटकर म्हणाले. या विषयावर झालेल्या चर्चेत भूपाल शेटे, परीक्षित पन्हाळकर यांनीही भाग घेतला.४५ कोटी गाळावर खर्च करणार?राष्ट्रीय तलाव संवर्धन अंतर्गत कामे करायची असल्याने तेथे प्राधान्याने तलावाचे संवर्धन करण्याची कामे करणार आहोत. फक्त दहा टक्के कामे ही बांधकामाशी संबंधित असतील. २२ कोटींचा एसटीपी बांधणे, ४५ कोटी खर्चून तलावातील गाळ काढणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत, असा खुलासा आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी केला.
बोगस एनओसी देणारी टोळी
By admin | Updated: September 25, 2015 00:23 IST