कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह कल्लोळ (ता. चिकोडी) येथील दूधगंगा नदीपात्रात आढळून आला. साक्षी दशरथ काटकर (वय १७) असे विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, मुलगी सासरी नांदत नसल्याने मुलीला बापानेच नदीत ढकलून दिल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलिसांनी दशरथ काटकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, खून की आत्महत्या, याचा तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार बापाने चार दिवसांपूर्वी कुरुंदवाड पोलिसात दिली होती; मात्र दुसऱ्या दिवशी तक्रारदार दशरथ काटकरने स्वतःच मुलीला दानवाड पुलावरून दूधगंगा नदीपात्रात ढकलून दिल्याची पोलिसांना माहिती दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वजीर रेस्क्यू फोर्सने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने रविवारपासून दूधगंगा नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. सोमवारी सायंकाळी कल्लोळ हद्दीत दूधगंगा नदीपात्रात मृतदेह पाण्यावर तरंगताना रेस्क्यू फोर्सच्या जवानांना आढळून आला. शोधपथकात रौफ पटेल, सागर सुतार यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे पोलीस तपासानंतरच खून की आत्महत्या, याचा उलगडा होणार आहे.
-
-
चौकट – तर दुहेरी गुन्ह्याची शक्यता
बापानेच मुलीला नदीत ढकलून दिल्याची कबुली दिल्याची चर्चा आहे. खुनाचा उलगडा झाला तर बाप हा खून आणि अल्पवयीन मुलीचे लग्न करणे अशा दुहेरी गुन्ह्यात अडकण्याची शक्यता आहे.
चौकट – पोलिसांकडून ‘त्या’ व्यक्तीचा तपास
दत्तवाड (ता. शिरोळ) येथील एका तरुणाने सोमवारी सायंकाळी कीटकनाशक पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणासाठी त्याचा काही संबंध आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
फोटो – 16082021-जेएवाय-08-मृत साक्षी काटकर