उदगाव : येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या रामलिंग मंदिराजवळ गेले वर्षभर नौका पडून आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत दोघांनीही दुर्लक्ष केले आहे. पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांनी व्यवस्था व्हावी, म्हणून ही नौका देण्यात आली आहे. परंतु गेले वर्षभर एकाच ठिकाणी नौका पडून असल्याने त्यामध्ये काठोकाठ पाणी साचले आहे. एकंदरीत त्या नौकेला कोणीच वालीच मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उदगांव (ता. शिरोळ) येथे महापुरावेळी नागरिकांना स्थलांतरित करण्यात यावे, पूरपरिस्थितीचे योग्य नियोजन व्हावे, याकरिता जिल्हा परिषदेकडून नौका प्रदान करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ही नौका रामलिंग मंदिरासमोर ठेवण्यात आली आहे. यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे याचा लाकडी सांगाडा पूर्णपणे खराब झाला आहे. पूरपरिस्थिती वगळता ही नौका उलटी करून ठेवणे गरजेचे आहे. तेवढी तसदीदेखील ग्रामपंचायतीने न घेतल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
फोटो -१९०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथील रामलिंग मंदिराजवळ असलेली नौका पाण्याने पूर्ण भरली आहे. (छाया-अजित चौगुले, उदगाव)