भुदरगड पंचायत समिती सभापती किर्ती रणजित देसाई यांनी सभापतिपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे नुकताच दिला आहे. सभापतिपदाच्या कार्यकालासाठी दिलेली मुदत संपल्याने श्रीमती देसाई यांनी राजीनामा सुपूर्द केला.
पंचायत समिती निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता मिळविली होती. सभापतिपदासाठी सर्वप्रथम सरिता वरंडेकर यांना सव्वा वर्षासाठी संधी दिली होती. दुसऱ्यावेळी स्नेहल परीट यांना दीड वर्षांसाठी संधी दिली होती तर तिसऱ्या वेळी किर्ती देसाई यांना संधी दिली होती. दीड वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर किर्ती देसाई यांनी सभापतिपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत प्रवीण नलवडे यांच्या गटाने आमदार आबिटकर यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने आणि त्यांची वाटचाल आबिटकर गटाकडे सुरू असल्याचे पाहता पुढील सभापती म्हणून भाजपच्या अक्काताई नलवडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.