राशिवडे : भोगावती साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अविनाश तुकाराम पाटील (राशिवडे) यांना संचालक मंडळातून अपात्र ठरविल्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) सहनिबंधक सचिन रावल यांनी दिला. तसेच पुढील निवडणुकीत संचालक म्हणून निवडून येण्यास, पुन्हा नियुक्त करण्यास किंवा स्वीकृत घेण्यास अपात्र असल्याचा आदेश दिला असल्याची माहिती ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आदेशाने ‘भोगावती’च्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पी. डी. धुंदरे म्हणाले, ‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील यांनी कारखान्याकडून दि. १७ आॅगस्ट २०१२ ला दहा हजार रुपये व दि. ९ एप्रिल २०१३ रोजी पंधरा हजार रुपये उचल केली होती. ही रक्कम कायद्यातील तरतुदींप्रमाणे कारखान्याकडे जमा केली नसल्याने त्यांना संचालक पदावरून कमी करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालक (साखर) सहनिबंधक सचिन रावल यांनी हा आदेश दिला. कारखान्याचे विद्यमान संचालक असताना वैयक्तिक कारणाकरिता घेतलेल्या रकमेचा भरणा मुदतीत न केल्यामुळे सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील यांनी दहा हजार रुपये दहा महिने दोन दिवस व पंधरा हजार रुपये दोन महिने दहा दिवस वापरले असल्याचे सिद्ध झाले, तर २०१२-१३ च्या लेखा परीक्षण अहवालात दहा हजार बाकी असल्याची नोंद निदर्शनास आणून दिली. सहकारी संस्था अधिनियम कलम ७३ क, अ नुसार संचालकाने अनामत रक्कम घेतली असल्यास तीस दिवस संपण्याच्या आत अनामत रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यास संबंधित संचालक अपात्र ठरतो, अशी माहिती यावेळी दिली. या आदेशाच्या प्रती चेअरमन व कार्यकारी संचालक भोगावती साखर कारखाना व साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आल्या आहेत.पत्रकार बैठकीस माजी सरपंच बी. एन. गोंजाणे, ‘भोगावती’चे माजी संचालक बाळिशा बिरंजे, वसंतराव जोंग, दिलीप पाटील, प्रकाश रणदिवे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2015 23:28 IST