अशोक पाटील -इस्लामपूर ,, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीने निवडणूक लढविण्याबाबत रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसच्या नानासाहेब महाडिक यांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणूक लढविण्याबाबत पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य भीमराव माने शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांनी जयंत पाटील यांना आव्हान देण्याची भाषा केली आहे. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता आहे.लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याच टप्प्यात जयंत पाटील यांच्याविरोधात माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील यांच्यासह शिवसेनेचे आनंदराव पवार यांनी भूमिका जाहीर केली होती. पवार यांनी उध्दव ठाकरे यांना आमंत्रित करून इस्लामपूर येथे शिवसेनेचा मेळावाही घेतला होता. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला मिळेल असा शिवसैनिकांचा दावा आहे. दरम्यान, महाडिक यांनीही शिवसेना प्रवेशाबाबत चाचपणी केली. परंतु त्यांना अनेक अडचणी आल्या आहेत.कसबे डिग्रज मंडलातील आठ गावांचा समावेश इस्लामपूर मतदारसंघात झाला असून, कवठेपिरानचे माजी सरपंच व विद्यमान जि. प. सदस्य भीमराव माने यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात अनेकदा बंडाचा झेंडा उभारला. मात्र त्यांचे बंड थंड करण्यात पाटील यशस्वी झाले. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माने पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मोदी लाटेवर स्वार होऊन शिवसेनेतून जयंत पाटील यांना आव्हान देण्याची भाषा ते करू लागले आहेत. त्यामुळे इस्लामपूर मतदार संघातील महायुतीतील काही नेते अस्वस्थ झाले आहेत. कारण दावेदारांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. या मतदार संघाचे मतदान २ लाख ४३ हजार ६४७ आहे. त्यापैकी डिग्रज मंडलामध्ये समाविष्ट असलेल्या आठ गावांचे मतदान ४३ हजार ९७१ आहे. मात्र इस्लामपूर, आष्टा परिसरात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते माने यांना मदत करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात बंडाची भाषा करणारे सर्वच नेते राष्ट्रवादीच्या पुलाखालून गेले आहेत.भीमराव माने हेही आमचेच आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात काय होणार याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
भीमराव माने यांच्या भूमिकेमुळे महायुतीत आणखी अस्वस्थता
By admin | Updated: August 5, 2014 23:21 IST