लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी साेमवारी झालेल्या छाननीत भारती विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, पी. जी. शिंदे, यशवंत नांदेकर आदी प्रमुखांचे अर्ज अवैध ठरले. संघाच्या पोटनियमानुसार दूध पुरवठ्यासह पशुखाद्याच्या अटींची पूर्तता न केल्याचा फटका दिग्गजांना बसला. छाननीत ४१ जणांचे अर्ज थेट अवैध ठरले तर ३५ जणांची सुनावणी घेऊन आज निर्णय होणार आहे, त्यामुळे ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी छाननी प्रक्रिया सुरू केली. सुरुवातील सर्वसाधारण गटातील वैध अर्ज निश्चित करण्यात आले. त्यावर हरकत नोंदवण्याचे आवाहन केल्यानंतर अवैध अर्ज बाजूला काढले. अवैध अर्जांबाबतही म्हणणे ऐकून घेतले. छाननीत ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरले, त्यापैकी ३५ जणांनी हरकत घेतली, त्यावर सुनावणी झाली असून आज, मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी निकाल देणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी दीडपर्यंत छाननी होऊन त्यानंतर सुनावणी घेण्यात आली.
पंच कमिटीचा सहा महिलांना फटका
राखीव गटातून उमेदवारीसाठी मतदार यादीत नाव नसले तरी संबंधित संस्थेच्या पंच कमिटीत असणे बंधनकारक आहे. या मुद्यावरून शीतल अनिल पाटील (वाकरे), श्वेता सदानंद हत्तरकी (हलकर्णी), अर्चना जीवन पाटील (कूर), सुहासिनी विजय भांदिगरे (आकुर्डे), सुप्रिया साळोखे (राधानगरी) व जयश्री उत्तम पाटील (बाचणी) यांचे अर्ज अवैध ठरले. सुहासिनी भांदिगरे यांनी प्रतिज्ञापत्रच दाखल केले नव्हते.
सूचक, अनुमोदक एकच अन् ऑडिट वर्ग ‘क’
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांचे सूचक व आण्णासाहेब पाटील यांचे अनुमोदक एकच राहिल्याने हा मुद्दाही छाननीदरम्यान पुढे आला होता. त्याचबरोबर विठ्ठल कांबळे (आवळी, राधानगरी) हे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेचा ऑडिट वर्ग ‘क’ असल्याने ते अपात्र ठरले.
रेडेकर सर्वसाधारणमधून अवैध
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंजना रेडेकर यांचा सर्वसाधारण गटातून अर्ज अवैध ठरला. महिला राखीव गटातून त्या पात्र ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
छाननी ठिकाणी एकालाच प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी छाननी ठिकाणी एकालाच प्रवेश दिला होता. अर्जदारासोबत आलेल्यांना बाहेर उन्हातच थांबवावे लागले होते.
अर्जांचा घोषवारा असा-
गट इच्छुक दाखल अर्ज अवैध निर्णय प्रलंबित
सर्वसाधारण १७१ २७६ १६ १५
महिला ७४ १०० १४ ११
इतर मागासवर्गीय ४६ ६७ ७ ३
भटक्या विमुक्त १३ १९ ३
अनूसूचित जाती १५ २० ४ ३
एकूण ३१९ ४८२ ४१ ३५
या प्रमुखांचे अर्ज झाले बाद
भारती विजयसिंह डोंगळे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, यशवंत नांदेकर, पी. जी. शिंदे, संभाजीराव पाटील-कुडित्रेकर, के. एस. चौगले, राजेंद्र सूर्यवंशी, सुप्रिया साळोखे, रूपाली तानाजी पाटील, तेजस्विनी अविनाश पाटील, श्वेता हत्तरकी, अर्चना जीवन पाटील, सुहासिनी भांदिगरे, शैलेजा सतीश पाटील, सुशीला नामदेवराव भोईटे, सुनीता धनाजीराव देसाई, गंगाधर व्हसकोटी, अप्पी पाटील, आण्णासाहेब पाटील, रमेशराव वारके, शशिकांत आडनाईक.