कणकवली : बोराची बी श्वासनलिकेत अडकल्याने गुदमरून वागदे (ता. कणकवली, जि. सिंधुुुदुर्ग) येथील स्वरा कदेश नाईक या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. काल, गुरुवारी पहाटे ही घटना घडली. अत्यवस्थ स्थितीत स्वराला गोवा-बांबुळी येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.वागदे- बौद्धवाडीत कदेश नाईक (मूळ रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) भाड्याच्या खोलीत राहतात. असरोंडी हायस्कूलमध्ये ते शिपाई म्हणून नोकरी करतात. त्यांची मुलगी स्वराने बुधवारी रात्री घरात गावठी बोराचे फळ तोंडात टाकले आणि त्याची बी घशात अडकली. त्यामुळे ती गुदमरली. घरातल्यांनी तिला वागदेत खासगी डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर कणकवली येथे खासगी डॉक्टरांकडे तिला नेण्यात आले.त्यांनी तिच्या घशातील बी काढण्यास असमर्थतता दर्शविली. स्वराच्या कुटुंबीयांनी बुधवारी रात्रीच अत्यवस्थ स्थितीत तिला गोवा-बांबुळी येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
बोराची बी घशात अडकली; बालिकेचा गुदमरून मृत्यू
By admin | Updated: November 29, 2014 00:28 IST