कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील खासगी प्राथमिक, विनाअनुदानित आणि महापालिकेतील पाचवी ते आठवीचे वर्ग उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. आठ महिन्यांनंतर येथील १७७ शाळांची घंटा वाजणार असून ३३ हजार ४१२ विद्यार्थी पुन्हा शाळेत येणार आहेत. रोज दिवसभरात केवळ तीन ते चार तासच शाळा भरणार आहेत. पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले जाणार असून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे.
दरवर्षी जूनपासून शाळा सुरू होतात. मात्र, कोरोनामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद होत्या. टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यापासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. आता बुधवारपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होत आहेत. यासाठी राज्य शासनाकडून सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील खासगी प्राथमिकच्या २९ शाळा, मनपाच्या ५८ आणि विनाअनुदानित ९० शाळांतील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.
चौकट
पाचवी ते आठवीच्या सुरू होणाऱ्या शाळा, विद्यार्थी संख्या
शाळा विद्यार्थी
खासगी प्राथमिक २९ २८७१
खासगी माध्यमिक ६० १८७७३
मनपा शाळा ५८ ३०१८
विनाअनुदानित ९० ९७५०
चौकट
मनपा शाळेतील शिक्षक संख्या : ३६४
शिक्षकेतर कर्मचारी : ६७
चौकट
विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी
प्रत्येक विद्यार्थ्यास मास्क बंधनकारक असणार आहे. पाण्याच्या बॉटल स्वतंत्र आणाव्या लागणार आहेत. वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तू आणि वापरलेला मास्क वापरून चालणार नाही. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
प्रतिक्रिया...
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, प्रवेशद्वारातच सर्वांचे थर्मल स्कॅन करणे, आजारी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या सूचना सर्व शाळांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगने दिल्या आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. रोज तीन ते चार तासच शाळा सुरू राहणार आहे.
- शंकर यादव, प्रशासनाधिकारी,
शिक्षण समिती, महापालिका
प्रतिक्रिया
राज्य शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. येणाऱ्या संमतीपत्रांचा विचार करून एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशा बैठक व्यवस्थेचे नियोजन केले जाणार आहे.
- रसूल पाटील, कार्य. अधिकारी
शिक्षण विभाग महापालिका.