लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पैसे दिले नाही म्हणून येथील मध्यवर्ती बसस्थानकातील चंदगड फलाटावर झोपलेल्या व्यक्तीला दोघांनी दगडाने व लाथाबुक्कांनी मारहाण केली. या मारहाणीत दीपक तुकाराम गावडे (रा. पाटणे, ता. चंदगड. सध्या रा. बागल चौक) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहुपुरी पोलिसांनी एका महिलेसह दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दुचाकी चोरी
कोल्हापूर : मार्केट यार्डमधील मार्केट कमिटीसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने बनावट चावीचा वापर करुन अगर लॉक तोडून चोरुन नेल्याची तक्रार सखाराम गणपती आळवेकर (वय ५५, रा. लक्षतीर्थ वसाहत) यांनी शाहुपुरी पोलीस स्थानकात दिली आहे.
दोन दुचाकींची धडक
कोल्हापूर : आर. के. नगर ते मोरेवाडी मार्गावर भारती विद्यापीठानजीक दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात शिवाजी लक्ष्मण साठे (वय ७२, रा. केएमटी कॉलनी, भारती विद्यापीठसमोर) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग़्णालयात उपचार सुरु असून, करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.