जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या अधिक असूनही रुग्ण बीम्समध्ये उपचारासाठी का येत नाहीत? याबाबत दास्तीकोप्प यांना विचारण्यात आले. सरकारी सुविधा असूनही बीम्सकडे नागरिक पाठ फिरवत आहेत. याबाबत स्पष्टीकरण विचारण्यात आले. बीम्सच्या कारभारावर असमाधान व्यक्त करून लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
कोविड-१९ नियंत्रण, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर लसीच्या पुरवठ्यासंदर्भात जिल्हा पंचायत सभागृहात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी होते. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट : लसींचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणासाठी तसेच रेमडेसिविर लसीचा पुरवठा आणि या लसीचा होणार काळा बाजार रोखण्यासाठी उमेश कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली कोविड नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणारी सर्व उपाययोजना करण्यात येईल. शिवाय लसींचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
रेमडेसिविर लसींचा तुटवडा असल्याचे वृत्त हाती आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील लोकसंख्या ५० लाखांहून अधिक आहे. यामुळे लसींचा तुटवडा जाणवत आहे. परंतु, यासंदर्भात येत्या दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना लस पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लोकसंख्येनुसार लस उपलब्ध करण्यासाठी सहायक औषध नियंत्रण मंडल सूचना देण्यात आल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.