सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असताना माणसं जोडण्याची हातोटी फार कमी व्यक्तींना साध्य होते. राजकारणात मित्रांपेक्षा शत्रूच जास्त निर्माण होतात. पण समाजकारण, राजकारण यापलीकडे जाऊन समाजातील विविध स्तरातील असंख्य माणसांचे प्रेम संपादन करण्याची किमया साधणारे नेतृत्व म्हणून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा उल्लेख करावा लागेल. एका बाजूला सहकार, उद्योग, शेती, विकास अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने प्रगतीची घोडदौड करीत असताना, उपेक्षित घटकांपासून कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत व्यक्तींचा प्रचंड लोकसंग्रह त्यांनी जपला आहे. श्यामरावअण्णांच्या पश्चात यड्रावकर गटाची सूत्रे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे आली. त्यांनी आपला गट अभेद्य राहावा आणि कार्यकर्ता एकसंध राहावा म्हणून विविध संस्था उभारण्याचा धडाका लावला. उद्यमशील दृष्टिकोन असलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सर्व संस्था सुयोग्यपणे चालविल्या. शैक्षणिक संस्था प्रगतिपथावर आणल्या. यामुळे कार्यकर्त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुखकर झाला.
आपल्या नेतृत्वकौशल्याने जयसिंगपूर नगरपालिकेवर आपला ठसा उमटविला. शरद साखर कारखान्याची धुरा सांभाळून तो कर्जमुक्त केला आणि त्यांच्या राजकारणविरहित दृष्टिकोनातून केलेल्या कामामुळे विविध क्षेत्रामध्ये आपले नेतृत्वकौशल्य सिध्द केले आहे. याच नेतृत्वकौशल्यामुळे २०१५ मध्ये जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या केडीसीसी बँकेवर संचालकपदी विराजमान झाले. त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व उपेक्षितांना अर्थपुरवठा करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते आमदार म्हणून उच्चांकी मताने निवडून आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग व सांस्कृतिक कार्य या खात्यांची जबाबदारी यड्रावकर यांच्यावर देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये आपल्या नेतृत्वकौशल्याने सर्वच खात्यांच्या संबंधित विभागांशी संवाद ठेवून भरघोस निधी आणून कायापालट सुरू ठेवला आहे. अशा स्वकर्तृत्वाने अनुभव प्राप्त करून या कुशल नेतृत्वाने समाजकारणाबरोबरच राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा यासह सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिले आहे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केले आहे. अशा या स्वयंभू नेतृत्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
- घन:श्याम कुंभार, यड्राव