कोल्हापूर : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असली, तरी ‘आकड्यां’चे गणितच उमेदवारी ठरविणार आहे. कोणाकडे किती मतदान, दुसऱ्या पक्षाचे सदस्य कोणाच्या मागे अधिक, याबरोबरच निवडणुकीतील आर्थिक गणित, या सर्व गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. साधारणत: २५ नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच विधान परिषदेची रणधुमाळी सुरू होणार आहे. विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांची मुदत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. त्यामुळे तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, २५ नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेस पक्षाकडून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय करणे हा प्रदेश कॉग्रेससमोर पेच ठरत आहे. गत निवडणुकीत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सतेज पाटील यांचा विरोध डावलून काँग्रेसने महादेवराव महाडिक यांना उमेदवारी दिली; पण आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण वेगळे आहे, अशा परिस्थितीत उमेदवारी कोणाला द्यायची, हा पेच पक्षश्रेष्ठींसमोर आहे. आमदार महाडिक व सतेज पाटील यांची मोट बांधून उमेदवारी देणे किंवा दोघांना वगळून तिसऱ्याला उमेदवारी देणे काँग्रेसला तितकेसे सोपे नाही. त्यामुळे व्यक्तीपेक्षा इलेक्टिव्ह मेरिटच उमेदवारी निवडीत सरस ठरणार आहे. राष्ट्रवादीची सतेज पाटील यांना पसंती? कॉग्रेस देईल त्या उमेदवाराच्या मागे राहण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे; पण ‘गोकुळ’, जिल्हा बॅँक, बाजार समिती व महापालिका निवडणुकीत घडलेल्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली पसंती सतेज पाटील हेच असतील.
‘आकड्यां’च्या गणितावरच उमेदवारी
By admin | Updated: November 19, 2015 01:12 IST