विश्वास पाटील -कोल्हापूर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विश्वासदर्शक ठराव कसाबसा का असेना मंजूर करून घेतल्याने आता या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे कार्यकर्त्यांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. वीस नोव्हेंबरला ते परत येत आहेत. त्यामुळे त्यानंतरच हा विस्तार होण्याची शक्यता पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.पश्चिम महाराष्ट्रातून सध्या चंद्रकांतदादा पाटील व पुण्यातून दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्णांतील आणखी कुणाला संधी मिळेल यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामध्ये आमदार गिरीष बापट, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, शिराळ््याचे शिवाजीराव नाईक व सोलापूरचे सुभाष देशमुख यांची नांवे चर्चेत आहेत. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचाही मंत्रिपद मिळावे, असा प्रयत्न असला तरी एक कॅबिनेट मंत्रिपद कोल्हापूरला मिळाले असल्याने पुन्हा या जिल्ह्णाला प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता कमी वाटते.भाजपने मंत्रिपद देताना संबंधित आमदारांची अन्य कोणतीही पात्रता पाहण्यापेक्षा भाजपची ताकद वाढविण्यासाठी त्यांचा कितपत उपयोग होईल याचा निकष सर्वांत महत्त्वाचा मानला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना जे पहिल्याच दणक्यात थेट कॅबिनेटमंत्रिपद मिळाले त्यासही हाच निकष कारणीभूत ठरला आहे. पक्ष वाढविणारा व शक्यतो पक्षाच्या मुशीतच तयार झालेला कार्यकर्ता मंत्री करावा, असा आग्रह पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडूनही धरला जात आहे. सध्या भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेले वैर, अल्पमतातील सरकार, बेभरवशाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे एक-दोन वर्षांतच पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल की काय, अशी भीती भाजपलाही वाटत आहे. त्यामुळे त्यावेळी मजबूत पक्ष घेऊन मैदानात उतरायचे असेल तर संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यायला हवे, या दृष्टीने मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाहिले जात आहे.साताऱ्यात या पक्षाला प्रतिनिधीत्व नसल्याने तिथे कुणाला संधी देण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे उर्वरित सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्णांतून आणखी किमान एकास मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यासाठी सोलापुरातून सुभाष देशमुख यांचे नाव पुढे आहे. ‘लोकमंगल’ उद्योग समूहाच्या निमित्ताने त्यांचे विविध उपक्रम सुरू आहेत. पुण्यातून बापट यांचे नाव आतातरी निश्चितच मानले जाते. त्यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येणार होते परंतु तिथे त्यांना बाजूला करण्यात आले. बापट पाचव्यांदा आमदार झाले आहेत परंतु पक्ष वाढविण्यात त्यांनी फारसा रस घेतलेला नाही शिवाय त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही घनिष्ट संबंध आहेत. त्याचा पक्ष कितपत विचार करतो यावर त्यांचे मंत्रिपद अवलंबून असेल. सांगलीतून सुरेश खाडे की शिवाजीराव नाईक अशी स्पर्धा आहे. खाडे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांचा जास्त आग्रह आहे. खाडे हे मागासवर्गीय समाजातील असल्याने तो समतोल साधायचा झाल्यास त्यांना संधी मिळू शकते.नाईक यांच्या मंत्रिपदासाठी खासदार राजू शेट्टी यांचे प्रयत्न आहेत. नाईक स्वच्छ चारित्र्याचे व अभ्यासू आहेत. त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे परंतु जिल्ह्णात त्यांचा राष्ट्रवादीशी उभा दावा आहे. गडकरी समर्थक...बापट, सुभाष देशमुख, शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांना नमनालाच गडकरी यांनी अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मंत्रिपदे देताना भाजप कितपत मोठेपणा दाखवितो ही बाबही निर्णायक आहेच.
बापट, खाडे, नाईक मंत्रिपदाच्या स्पर्धेत
By admin | Updated: November 15, 2014 00:05 IST