मिरज : मिरजेत कर्जदाराच्या घराच्या जप्तीसाठी आलेल्या बँक अधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेने पिटाळून लावले. बँकेने दिलेले कर्ज बोगस असल्याने कर्ज भरणार नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतल्याने वसुलीचे काम थांबविण्यात आले. मिरजेत स्वयंपाकी म्हणून क ाम करणाऱ्या नामदेव ढवळे यांच्या घराच्या खोलीचे बोगस गहाणपत्र करून बँक आॅफ महाराष्ट्रच्या सांगली शाखेतून कर्ज उचलण्यात आल्याची तक्रार आहे. याबाबत नामदेव ढवळे यांनी असिफ पठाण व विलास माने यांनी बोगस कागदपत्राआधारे फसवणूक करून त्यांच्या नावावर कर्ज घेतल्याची पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र तक्रारीची दखल न घेता बँकेचे अधिकारी आज ढवळे यांच्या घराची खोली जप्त करण्यासाठी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आले होते. याची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, रावसाहेब पाटील, नायकू माळी, महादेव पाटील, माणिक माळी, शशिकांत गायकवाड, इसाक सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जप्तीच्या कारवाईपासून रोखले. कर्ज न घेणाऱ्यास बेघर होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई स्थगित केली. (वार्ताहर)
बँक अधिकाऱ्यांना पिटाळल
By admin | Updated: August 5, 2014 23:21 IST