म्हसवड : घरातून गुप्तधन काढून देतो, असे आमिष दाखवून एका रिक्षाचालकाला पावणेदोन लाखांना गंडा घालणाऱ्या दोघांना जमावाने बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.अतुल जालिंदर वाघमारे, दादासो सुखदेव यमगर (दोघेही, रा. चोरोची, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हसवड येथील संतोष दत्तात्रय त्रिगुणे हे रिक्षा चालवितात. काही दिवसांपूर्वी वाघमारे व यमगर त्यांना भेटले. तुमच्या घरातून सोन्याच्या वस्तू काढून देतो, त्यासाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्रिगुणे यांनी त्यांना पैसे दिले. हे दोघे दि. १७ रोजी त्रिगुणे यांच्या घरी आले. त्यावेळी त्रिगुणे यांना त्यांनी घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. घरात कोणी नसताना या दोघांनी हातचलाखी करून विठ्ठल-रुक्मिणीची पिवळ्या धातूची मूर्ती व काही काचेच्या वस्तू त्रिगुणे यांच्या घरात खड्डा खणून ठेवल्या. त्यानंतर या दोघांनी त्रिगुणे कुटुंबीयांना घरात बोलाविले. घरात खड्डा खोदा, तुम्हाला या ठिकाणी धन सापडेल, असे सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी खोदले असता पुरून ठेवलेल्या वस्तू आढळल्या.सोन्याच्या वस्तू सापडल्याचा आनंद त्रिगुणे कुटुंबीयांना झाला; परंतु या वस्तू खऱ्या आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांनी एका ठिकाणी नेल्या. येथे त्यांना त्या वस्तू खोट्या असल्याचे समजले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार त्यांनी आपल्या मित्रांना सांगितला.आणखी एकाच्या घरात गुप्तधन शोधायचे आहे, असे सांगून या दोघांना म्हसवडला बोलावून घेण्यात आले. हे दोघे आल्यानंतर त्यांना निर्जन ठिकाणी नेण्यात आले. येथे त्यांची यथेच्छ धुलाई करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अतुल वाघमारे, दादासो यमगर यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
गुप्तधनाच्या आमिषाने गंडा
By admin | Updated: August 18, 2015 23:33 IST