गडहिंग्लज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक आयुष विभागाला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा दिला असून, भारतीय आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आयुर्वेदाला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.आयुष विभागाचे मंत्री नाईक यांनी येथील कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयास सदिच्छा भेट दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री नाईक म्हणाले, आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र असतानाही केवळ पुराव्याअभावी जागतिक स्तरावर मागे पडले आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी आयुर्वेदाची ताकद जगाला दाखवून द्यावी.मंत्री नाईक यांचा संस्था सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते, तर विजया नाईक यांचा प्राचार्या वीणा कंठी व श्रद्धा शिंत्रे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार झाला. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, संस्था उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा, किरण पाटील आदी उपस्थित होते. प्रा. शिंत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर येसणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विराज शुक्ल यांनी आभार मानले.
आयुर्वेदाला आता ‘अच्छे दिन’
By admin | Updated: January 20, 2015 23:41 IST