कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीज ग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ‘ऑनलाइन’ सोयीद्वारे घरबसल्या वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणकडून आधीपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाभ राज्यातील ६५ लाख ग्राहक आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा अधिक वापर करण्यासाठी महावितरणने आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ग्राहक ऑनलाइन पद्धतीनेच वीज बिलाचा भरणा करतात.
‘ऑनलाइन’द्वारे वीज बिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोहोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाइटवर व मोबाइल ॲपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीज बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीज बिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशीलदेखील देण्यात येत आहे.
चौकट
ऑनलाइन वीज बिल भरणा नि:शुल्क
महावितरणची वेबसाइट व मोबाइल ॲपद्वारे तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाइन’ वीज बिल भरणा क्रेडिट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. लघु दाब वीज ग्राहकांसाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बँकिंगद्वारे वीज बिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीज बिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते; परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबँकिंग, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे.