गडहिंग्लज : शिवसेना व भाजप सोडून कुणाशीही युती करण्याचे स्वातंत्र्य शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकांबाबतीत निर्णय घेतला जाईल. सन्मानाची आघाडी जमली नाही, तर स्वबळावर लढण्याचीही आपली तयारी आहे. मात्र, गडहिंग्लज पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्याच्या आपल्या शिरस्त्यानुसार ते गडहिंग्लजला आले होते. यावेळी नेहमीप्रमाणे पत्रकारांना आवर्जून बोलावून घेऊन त्यांनी गडहिंग्लज पालिकेची निवडणूक आणि दौलत ‘न्युट्रियन्स’ला चालवायला देण्यापाठीमागची आपली भूमिका देखील दिलखुलासपणे स्पष्ट केली. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्याशी संबंधित गोकाकच्या ‘न्यूट्रियन्स’ला ‘दौलत’ चालवायला दिल्यामुळे राष्ट्रवादीचा कोणताही तोटा होणार नाही. ‘ब्रिस्क’कडे गडहिंग्लज कारखाना चालवायला दिल्यानंतर जे प्रश्न निर्माण झाले तेच प्रश्न ‘चंदगड’मध्येही असतील आणि ‘गडहिंग्लज’च्या ‘राजकारणा’त झाले तेच होईल. किंबहुना गेल्यावेळी संध्यादेवी कुपेकर ह्या ‘अप्पीं’च्या बंडखोरीमुळेच निवडून आल्या आहेत. लक्ष्मणासारखा मी त्यांच्या पाठीशी ठाम आहे. स्व. कुपेकरांची ‘पुण्याई’ आणि गडहिंग्लजच्या जनतेचे प्रेम व पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत संध्यादेवींना कोणताही धोका नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले. दहावेळा निविदा काढूनही कुणाकडूनही प्रतिसाद नसल्यामुळे ‘जिल्हा बँक’ आणि ‘दौलत’ वाचविण्यासाठी न्युट्रियन्सशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असेही त्यांनी नमूद केले. गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत जनता दलाशी युती करण्याचा निर्णय प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला होता. तसे केले नसते तर राष्ट्रवादीमध्येच फूट पडली असती. त्यामुळे पक्षहित व कार्यकर्त्यांसाठीच ती युती केली. ‘कागल’ नगरपालिकेत विक्रमसिंह घाटगे गटाच्या शाहू आघाडीशी, तर मुरगूडमध्ये पाटील गटाशी आपली युती आहे. मात्र, गडहिंग्लज कारखान्यातील युती काही कार्यकर्त्यांना रुचली नसली तरी ते घरातील भांडण आहे, त्यांची समजूत घातली जाईल. (प्रतिनिधी) ‘एमआर’च्या तुकडीबाबत चर्चा करणार ‘एम. आर.’ प्रशालेच्या विनाअनुदानित तुकडीच्या प्रश्नांची माहिती घेतली आहे. त्या संदर्भात आपण शिक्षणमंत्री व जि. प.च्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. गडहिंग्लज परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
गडहिंग्लज पालिकेसाठी स्वबळाची तयारी
By admin | Updated: July 3, 2016 00:56 IST