ज्योतीप्रसाद सावंत - आजरा गडहिंग्लज येथून आजरा व आंबोलीकरिता स्वतंत्र वीजवाहिनी जोडली जाणार असून, यामुळे आता वीज जाणे हा प्रकार आजरा-आंबोलीवासीयांच्या दृष्टीने संपुष्टात येणार आहे. यामुळे आजरा व आंबोली परिसर अंधारमुक्त होणार असल्याची माहिती वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस यांनी दिली.आजरा तालुक्याला मुमेवाडी येथील वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मुमेवाडीतून मलिगे्र, गवसे व तेथून पुढे तालुकाभर वीजपुरवठा होतो. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास प्रथम मुमेवाडी, त्यानंतर मलिगे्र व गवसे उपकेंद्रातील वीजपुरवठा बंद पडतो. परिणामी, आजरा तालुक्यासह आंबोलीच्या काही परिसराला अंधाराशी सामना करावा लागतो. तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही. काहीवेळा एक-दोन दिवस सलग अंधारात घालवावे लागतात. घरगुतीसह शेती व औद्योगिक वीजपुरवठाही बंद राहतो.गेली ४० वर्षे आजरा तालुकावासीय या प्रकाराला सामोरे जात आहेत. ऐनवेळी वीजपुरवठा खंडित झाला तर लाईन दुरुस्तीशिवाय पर्याय नव्हता. परंतु, आता नवीन वाहिनी जोडली जाणार आहे. गडहिंग्लज-महागाव येथून काढण्यात येणाऱ्या या वीजवाहिनीमुळे मलिग्रे-गवसे वीजवाहिनीतून वीजपुरवठा खंडित झाल्यास पाचच मिनिटांत पर्यायी वीजपुरवठा महागाव उपकेंद्रातून सुरू होणार आहे. यामुळे विजेचा पुरवठा अखंड राहण्यास मदत होणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून वीजवाहिनी जोडण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. यामुळे कृषी, घरगुती व उद्योग क्षेत्रात खंडित वीजपुरवठ्यामुळे होणारे नुकसान टाळले जाणार असून, २५ हजार वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या वर्षभरामध्ये ही वीजवाहिनी जोडणी पूर्ण करण्याचे वीज कंपनीचे नियोजन आहे, असेही सिकनीस यांनी स्पष्ट केले.
आजरा, आंबोली होणार अंधारमुक्त
By admin | Updated: February 13, 2015 23:29 IST