हातकणंगले : तालुक्यातील ६९५ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना गेली दोन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे. नागरी बँका, पतसंस्था आणि विकास सोसायटीसह इतर संस्थांच्या निवडणुका गेली दोन वर्षे ठप्प झाल्या आहेत. मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाविरुद्ध गावोगावी कुरबुरी वाढल्याने तालुका उपनिबंधक कार्यालयाची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सहकारी संस्था असलेला तालुका म्हणून हातकणंगलेची वेगळी ओळख आहे. संचालक मंडळाची मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका सहकार कायद्यानुसार घेणे क्रमप्राप्त होते.
मात्र राज्यामध्ये मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. लॉकडाऊन असल्याने तसेच कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाकडून गेल्या दीड वर्षात दोनवेळा सहकारी संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढ मिळालेल्या संस्थाच्या संचालक मंडळाकडून संस्थाहिताचा कारभार होत नसल्याच्या तक्रारी तालुका उपनिबंधक यांच्याकडे प्राप्त होत असल्याने सहकार विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
निवडणूक पात्र संस्था
ब वर्ग संस्था = १६५
यामध्ये नागरी बँका, १ कोटीच्या वरील भागभांडवलधारक पगारदार नोकराच्या बँका, विकास सेवा सोसायटी, जिल्हा कार्यक्षेत्राबाहेरील नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, शासन अनुदान प्राप्त संस्था, औद्योगिक संस्था, खरेदी -विक्री संघ, जिल्हा ग्राहक संस्था.
क वर्ग संस्था = २७२ यामध्ये नागरी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, यंत्रमाग संस्था,ग्राहक संस्था, पणन संस्था, कृषी उद्योग संस्था, १ कोटीच्या आतील भागभांडवल कर्मचारी संस्था.
ड वर्ग संस्था = २५८ यामध्ये पाणीपुरवठा संस्था, मजूर संस्था, प्रक्रिया संस्था, हातमाग संस्था, गृहउद्योग संस्था, स्वयंरोजगार -बेरोजगार संस्था.