कोल्हापूर : संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोधमाेहिमेत सहभागी होण्यास नकार देण्याऱ्या आशा कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल गुरुवारी दुपारनंतर दिले. हजर न झाल्यास सेवा संपुष्टात आणून नवीन आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात येईल, असा इशाराही मित्तल यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सध्या संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोधमोहीम सुरू आहे. मात्र, वाढीव मानधनाची रक्कम न मिळाल्याने आशा स्वयंसेविकांनी या कामामध्ये सहभाग घेणार नसल्याचे पत्र २ डिसेंबरला प्रशासनाला दिले होते. सोमवारपासून (दि ७ डिसेंबर) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर शासनाकडून अनुदान प्राप्त होताच थकीत मानधन तातडीने अदा करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, तरीही या मोहिमेत सहभागी होण्यास आशांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या मित्तल यांनी हे आदेश काढले आहेत. आशा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका जाहीर केल्यानंतर लगेचच मित्तल यांनी पत्राद्वारे हा इशारा दिला. सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.
चौकट
पर्यायी व्यवस्थेची चाचपणी
आशा कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर आता पर्यायी व्यवस्था लावून सर्वेक्षण करता येईल का याची चाचपणी गुरुवारी दुपारनंतर घेण्यात आली. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी व्हीसीच्या माध्यमातून अनेकांशी चर्चा केली.