कोल्हापूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त औरंगाबादसह राज्यभरात गुरुवारी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. सर्व ठिकाणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. नागपूर, भंडारा, गोंदिया, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद या ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिरे पार पडली. राज्यभरातील विविध शहरात एकाच दिवशी पार पडलेल्या रक्तदान शिबिरांना शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यातून शेकडो बाटल्या रक्तसंकलन झाले.समाजात घडणाऱ्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवितानाच सामाजिक बांधीलकीचे व्रत जपलेल्या ‘लोकमत’च्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानासारख्या श्रेष्ठ दानाच्या माध्यमातून जणू माणुसकीच्या नात्याचा धागा जोडण्यात आला. कोल्हापुरात ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चाटे स्कूल येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन अर्पण ब्लड बँकेचे डॉ. पी. व्ही. गाढवे, रोटरी क्लब मेनचे अध्यक्ष मोहनभाई पटेल, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. भारत खराटे, युवा आॅर्गनायझेशनचे मंदार तपकिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले, वृत्तपत्र विक्रेते शंकर चेचर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला अर्पण ब्लड बँक, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर, चाटे स्कूल यांचे सहकार्य लाभले.यावेळी प्रा. भारत खराटे यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, रक्तदानासारखे श्रेष्ठ दान कोणतेही नाही. ‘लोकमत’ने हा उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपली आहे. मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून ‘लोकमत’शी जोडला गेलेलो आहे. त्यामुळे चाटे समूहाचा ‘लोकमत’च्या कार्याला सक्रिय पाठिंबा असेल. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच युवक, शिक्षक, महिला, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक व ‘लोकमत’मधील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. दिवसभरात ७५ पिशव्या रक्ताचे संकलन झाले. या उपक्रमास युवा आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष सोनल शिर्के, अनिकेत कोरगांवकर, सत्यजित पाटील, मुकुल शहा, सुमंत खराडे, सत्यजित जाधव, निखिल पाटील, संकेत श्रीखंडे, प्रतीक उत्तुरे, रोहित देसाई, अनुप देसाई, विक्रम आंबले यांचे सहकार्य लाभले. मांगुरे परिवाराचे १५१ वे रक्तदान यावेळी तब्बल १४१ वेळा रक्तदान केलेले राजेंद्र हिंदुराव मांगुरे व १० वेळा रक्तदान केलेले निनाद राजेंद्र मांगुरे आवर्जून उपस्थित होते. केवळ मांगुरे परिवाराने आजतागायत १५१ वेळा रक्तदान केले आहे. या समाजसेवेबद्दल ‘लोकमत’च्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्मार्ट सिटीच्या गुणांकनासाठी प्रयत्नशील
By admin | Updated: July 3, 2015 00:31 IST