लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड : महापुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी यापुढील काळात महापुराचा संभाव्य धोका गृहित धरूनच प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी सरूड येथील आढावा बैठकीमध्ये दिल्या. या बैठकीला माजी आमदार सत्यजित पाटील - सरूडकर उपस्थित होते.
खासदार माने म्हणाले, अतिवृष्टीबरोबरच नदी व ओढ्यालगत झालेल्या मानवनिर्मित अतिक्रमणामुळे महापुराची गंभीर समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे पूल, रस्त्यांची कामे करताना पाण्याचा प्रवाह अडवला जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.
माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, पूरग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी शासकीय यंत्रणेने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
यावेळी खासदार माने यांनी विविध खात्यांतील अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाचा विभागवार आढावा घेतला. तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, उपसभापती दिलीप पाटील, माजी उपसभापती पांडुरंग पाटील, सरपंच राजकुंवर पाटील, उपसरपंच भगवान नांगरे, जालिंदर पाटील - रेठरेकर, सुरेश पारळे, तहसीलदार गुरु बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.