गारगोटी येथील खडकगल्लीतील पुरुषोत्तम उर्फ राजू श्रीकांत कासार (वय-३१) या तरूणावर मुलगा, बाबा, भाचा या तिघांनी धारदार कोयता, लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. विक्रम गोविंद आरडे, करण विक्रम आरडे, स्वागत महादेव जाधव अशी संशयित आरोपींची नाव आहेत.
या घटनेची नोंद शनिवारी रात्री उशिरा भुदरगड पोलिसात झाली आहे.
खडकगल्लीतील पुरुषोत्तम उर्फ राजू कासार हा शनिवारी दुपारच्या सुमारास अंघोळीस जात असतांना औदुंबर किराणा दुकानासमोर दबा धरून बसलेल्या विक्रम आरडे, मुलगा करण, भाचा स्वागत यांनी " तू आमच्या सोबत का येत नाहीस " असे म्हणत अचानकपणे धारदार कोयता व लोखंडी रॉडने हल्ला केला. कासार याच्या पायावर, हातावर, पाठीवर कोयत्याने व लोखंडी रॉडने जोरदार मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कासार मयत झाल्याचे समजून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.
कासार याच्या उजव्या हातावर, पायावर, पाठीवर वर्मी घाव लागल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. त्याला तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटना घडून दुसरा दिवस लोटला तरी अद्याप हल्लेखोर फरारी आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मयेकर करीत आहेत.