देवाळे : आरळे (ता. पन्हाळा) येथे पंडित यशवंत गायकवाड यांच्या घरावर काल, गुरुवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून रोख रकमेसह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. पंडित गायकवाड (वय ३८) हे दरोडेखोरांना प्रतिकार करताना झटापटीत डोक्याला चाकू लागल्याने ते गंभीर जखमी झाले, तर पत्नी रेखा गायकवाड या किरकोळ जखमी झाल्या. या घटनेमुळे आरळे, बोरपाडळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यात एक दरोडेखोरही गंभीर जखमी झाल्याचे पंडित गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांचे घर आरळेच्या दक्षिणेला गावाच्या बाहेर असल्याने दरोडेखोरांनी फायदा घेतला. दरम्यान, आरळे येथीलच दीपक दशरथ जमदाडे यांची घरासमोर लावलेली सीडी डिलक्स (एमएच ०९ एएक्स १९८७) दरोडेखोरांनी लंपास केली. घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी- गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरळे येथील पंडित गायकवाड यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून त्यांची पत्नी रेखा यांचे मणिमंगळसूत्र, नथ, पैंजण, पाटल्या, जोडवी आणि रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. दरोडेखोर आणि पंडित गायकवाड यांच्यात सुमारे २० ते २५ मिनिटे झटापट सुरू होती. यात गायकवाड यांच्या डोक्याला व पोटावर गंभीर जखम झाल्याने ते जमिनीवर कोसळले. याचा फायदा घेत बाहेर थांबलेल्या दरोडेखोरांनी घरावर दगड मारले व पुढील दरवाजा निकामी केला. बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील आरळे-बोरपाडळे मार्गावरील विलास शंकर निकम या माजी सैनिकाच्या घराचा मागील दरवाजा काल, गुरुवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान दरोडेखोरांनी कापण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅटरीचा प्रकाश आणि आवाज यामुळे निकम व त्यांची पत्नी जागे झाले. त्यांनी पुढील दरवाजा उघडून दरोडेखोरांचा पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. तेथे पाना व इतर साहित्य पडलेले आहे. निकम यांच्या शेजारील सोमनाथ तेली यांच्या अॅपे रिक्षातील साहित्यही उचकटून टाकले होते. आरळे-बोरपाडळे मार्गावरीलच जाधव वस्तीवरील बाहेरच्या सोप्यावरील दोन मोबाईलही याच रात्री चोरीला गेले आहेत. या संपूर्ण प्रकाराने बोरपाडळे, आरळे, देवाळे शहापूर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यामुळे कोडोली पोलिसांचे गस्ती पथक असते कुठे, अशी चर्चा लोक करत आहेत. आरळे येथील चोरीची घटना घडल्यानंतर कोडोली पोलिसांना ताबडतोब कळविले असतानाही पोलीस पहाटे पाचच्या सुमारास दाखल झाले. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट करीत आहेत. (वार्ताहर)मुलांनी दरोडेखोरांना दिले पाणी..गायकवाड दाम्पत्यासोबत अनिकेत या सहावीत शिकणाऱ्या मुलानेही दरोडेखोरांना जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक दरोडेखोर म्हणाला की, ‘तुझ्या पप्पा, मम्मीला मारत नाही. आतून पिण्यासाठी पाणी आण’. त्याने रडत रडत दरोडेखोरांना पाणी दिले; परंतु दरोडेखोराने पाणी पिऊन आपला गुण दाखवत अनिकेतवर तोच तांब्या भिरकावला. या संपूर्ण प्रकाराने बोरपाडळे, आरळे, देवाळे शहापूर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ४ आरळे येथील दीपक दशरथ जमदाडे यांची मोटारसायकल दरोडेखोरांनी लंपास केली
आरळेत (ता. पन्हाळा) सशस्त्र दरोडा
By admin | Updated: October 17, 2014 23:36 IST