कोल्हापूर : परतीच्या मॉन्सूनमुळे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. रोज पाच हजार, ३० किलो वजनाच्या रव्यांची आवक कमी होत आहे. दरही क्ंिवटलच्या मागे शंभर रुपयांनी कमी आहे. पूर्ण क्षमतेने गुऱ्हाळघरे सुरू न झाल्यामुळे आवक अपेक्षित होत नसल्याचे सांगण्यात आले.व्यापारी पीक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल ऊसपीक घेण्याकडे असतो. उसाला चांगला भाव असल्यास शेतकरी कारखान्यांना ऊस देतो. उसापेक्षा गुळाला अधिक भाव असल्यास काही शेतकरी गुऱ्हाळघरे सुरू करतात. सर्वसाधारणपणे आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात समितीमध्ये गुळाची आवक सुरू होते. गेल्यावर्षी १ ते ९ नोव्हेंबरमध्ये एकूण १ लाख ४८ हजार ५३ रव्यांची (३० किलो वजनाचे) आवक झाली होती. कमीत कमी २७०० पासून दर्जानुसार ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला होता. सरासरी क्विंटलला तीन हजार दोनशे रुपये भाव मिळाला होता. दिवसाला १५ ते २० हजार रवे गुळाची आवक होत होती. यंदा १ ते ९ नोव्हेंबरअखेर १ लाख ५५ हजार ६९८ रव्यांची आवक झाली. कमीत कमी २७०० पासून ५ हजार ५०० पर्यंत दर मिळाला. सरासरी दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल भाव राहिला. आॅक्टोबरमध्ये पडलेल्या परतीच्या मान्सूनमुळे आवक घटल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
गेल्या वर्षाच्या तुलनेत गूळाची आवक कमी
By admin | Updated: November 11, 2014 00:02 IST