कोल्हापूर : पतसंस्थेचा बोजा व नाव कमी करण्यासाठी मूळ कागदपत्रे सही करून परत देण्याकरिता कर्जदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संभाजीनगर येथील तपोवन नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयित आरोपी उमेश मनोहर माने (वय ४३, रा. शहाजी वसाहत, शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास केली. याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी जयदीपसिंह विजयकुमार जाधव (३९, रा. महालक्ष्मी पार्क, शाहू कॉलनी) यांचे वडील विजयकुमार पांडुरंग जाधव व चुलते भारत पांडुरंग जाधव यांच्या मालकीचे (सि.स.नं. २२४२, बी वॉर्ड, कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ) येथे घर आहे. या घरावर ५ जुलै २००० रोजी तीन लाख रुपये स्थावर तारण कर्ज घेतले होते. या कर्जाची बँकेच्या सामोपचार योजनेनुसार ११ जून २०१४ रोजी पूर्ण परतफेड केली होती. याबाबत पतसंस्थेकडून दाखलाही घेतला आहे. त्यानंतर स्थावर मिळकतीवरील पतसंस्थेचा बोजा व नाव कमी करण्यासाठी (पुनर्हस्तांतरासाठी) जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडील आदेशाची प्रत मिळणे आवश्यक होती. त्यासाठी पतसंस्थेकडील कर्जप्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मागणीसाठी जयदीपसिंह जाधव यांनी संभाजीनगर येथील पतसंस्थेतील शासननियुक्त विशेष वसुली अधिकारी उमेश माने यांची भेट घेतली. यावेळी माने यांनी प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे जमा केला आहे. माझी सही देतो, त्याकरिता मला दोन हजार रुपये द्या, अशी मागणी केली तेथून परत येऊन जाधव यांनी थेट लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक उदय आफळे यांची भेट घेऊन तक्रार केली. आफळे यांनी सहकाऱ्यांना घेऊन आज दुपारी चारच्या सुमारास पतसंस्थेच्या बाहेर सापळा लावून माने यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर रात्री उशिरा त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याचे बँकेचे पासबुक व अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हस्तगत केली आहेत. (प्रतिनिधी)
‘तपोवन’च्या व्यवस्थापकास अटक
By admin | Updated: October 8, 2014 00:34 IST