कोल्हापूर : अनेक उपनगरे आणि शहरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोंडाळे गायब केले जात असून त्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही अधिकारी ‘आम्ही तुमचा कोंडाळा काढून देतो’ असे सांगून भ्रष्टाचार करत असल्याच्या तक्रारी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीकडे आल्या असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिले.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे शहरातील कचरा कोंडाळे, सार्वजनिक स्वच्छागृहांची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छताअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी समितीने केली.
रोजच्या रोज कचरा उठाव होणे गरजेचे होते, परंतु या गोष्टीकडे दुर्दैवाने प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कचरा कोंडाळे जाऊन दुसऱ्याच जागी आणि शहरातील मोकळ्या जागी कचऱ्याचे ढीग साठत आहेत परिणामी नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, डासांच्या प्रादुर्भावामुळे होणारे रोग याचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत याकडे प्रशासकांचे लक्ष वेधण्यात आले.
शिष्टमंडळात किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, अंकुश देशपांडे, सतीश पोवार, संग्राम जाधव यांचा समावेश होता.
फोटो क्रमांक - १६०९२०२१-कोल-बी वॉर्ड
कोल्हापूर शहरातील स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असून याप्रकरणी लक्ष घालावे, अशा मागणीचे निवेदन बी वॉर्ड अन्याय निवारण समितीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले.