सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाची कमान पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. जाधववाडी चेक पोस्टजवळ लाखो रुपये खर्च करून पर्यटकांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली ही कमान मागच्या महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कोसळली होती. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या स्वागत कमानीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारे प्राणी, पक्षी यांच्या लावण्यात आलेल्या प्रतिकृती वन्यजीव विभागाने पूर्ववत साकारल्या आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नाममात्र शुल्क आकारून पर्यटकांना प्रवेश दिला जातो. अभयारण्य परिसरात जंगली कोंबडी, घणेरा, बहिरी ससाणा, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, घनछडी, गरुड, मोर, लांडोर अशा विविध पक्षांसह विविध प्रकारचे सरडे, घोरपड, अजगर, नाग, घोणस, मण्यार आदी सरपटणारे प्राणी तसेच ससा, भेकर, पानकुदळा, गवा याशिवाय सकाळी किंवा सायंकाळी चारनंतर काही वेळा बिबट्याचेही पर्यटकांना दर्शन होते. या उद्यानात दिसून येणाऱ्या प्राण्यांची संख्या तुरळक असली तरी जैवविविधतेत जागतिक पातळीवर सातव्या स्थानावर असलेले हे उद्यान बारा महिने सदाहरित असते. नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा व त्यातील वाहते झरे, धबधबे हे येथील पर्यटनाचे आकर्षण आहे.
वन्यजीवन पाहण्यासाठी दरवर्षी देशभरातील हजारो पर्यटक व निसर्गप्रेमी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास भेट देत असतात.
- गोविंद लंगोटे ,रेंज फॉरेस्ट ऑफिसर-चांदोली वन्यजीव विभाग, वारणावती
अभयारण्यातील विविध पक्षी व प्राण्यांच्या प्रतिकृतींतून वन्यजीवांचे दर्शन घडविणारी ही स्वागत कमान कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. आता ती पूर्ववत उभारण्यात आल्यामुळे पर्यटकांसाठी पुन्हा ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.
०७ चांदोली१,२
फोटो :
वादळीवाऱ्याच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेली चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. (छाया : सतीश नांगरे)