लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे (स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शाखेच्या अंतिम वर्ष संगणक शास्त्र अभियांत्रिकीमधील मयूर फरताडे याने इंस्टाग्राम या सोशल मीडियामध्ये असणारी त्रुटी (बग) शोधून काढली. या बदल्यात फेसबुक कंपनीने त्याला बुधवारी तब्बल २२ लाखांचे पारितोषिक जाहीर केले. मयूर हा तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून कामगिरीबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी त्याचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
येथील मयूर फरताडे याच्या कामगिरीची सर्वप्रथम बातमी गुरुवारी ‘लोकमत’ने मांडल्यानंतर वारणा परिसरातून त्याच्या कौतुक होत होते. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, शिक्षण समूहाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम व कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राध्यापक-विद्यार्थी वर्गाने त्याचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. मयूर याने इंस्टाग्राममधील कमतरता सांगून अनेक युजरचा डेटा चोरण्यापासून वाचवले आहे. याची दखल घेत फेसबुकने बक्षीस जाहीर केले.
कोरे अभियांत्रिकी शाखेतील संगणक विभाग प्रमुख प्रा. ए. जी. पाटील, डॉ. गणेश पाटील, सर्व प्राध्यापक, रजिस्ट्रार व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ कसा सत्कारणी लावावा याचे उत्तम उदाहरण मयूरने प्रस्थापित केले आहे. त्याच्या या कामगिरीने त्याचे कुटुंबाचे आणि कॉलेजचे नाव तर उंचावलेच परंतु आपल्या देशाचे नावसुद्धा जागतिक माहिती तंत्रज्ञानाच्या पटलावर अधोरेखित केले आहे.
डॉ. एस. व्ही. आणेकर प्राचार्य - तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर
मयूर हा प्रथम वर्षापासूनच अनेक प्रोग्रॅमिंगच्या स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घ्यायचा व जिंकायचा, प्रोग्रॅमगची त्याला विलक्षण आवड, अनेक अवघड प्रोग्रॅम्स तो विलक्षण सहजतेने लीलया करायचा आणि याचाच फायदा त्याला हा बग शोधण्यासाठी झाला.
- प्रा. ए. जी. पाटील, संगणक विभाग प्रमुख
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय.
फोटो- मयूर फरताडे