कोल्हापूर : आजरा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर दोघांच्या नियुक्त्या केल्याने नेमके हजर कोणाला करून घ्यायचे, असा पेच उपअभियंता यांना पडला आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सावळागोंधळामुळे अद्याप हे पद रिक्त राहिले आहे. यासह अधिकाऱ्यांच्या ‘सोयी’साठी कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या बदल्या करण्याचा सपाटा लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग कार्यकर्तृत्वाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू झाला की, या विभागाचे कर्तृत्व ठळक जाणवते. आजरा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कनिष्ठ अभियंता हे पद रिक्त होते. त्याठिकाणी १० जून २०१६ ला शब्बीर गणी शेख यांची कनिष्ठ अभियंतापदी नेमणूक केली, पण त्यांची हजर होण्याची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच शरद श्रीपाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील हे गगनबावडा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. अॅन्टी करप्शन ब्युरोने त्यांना लाच घेताना पकडल्याने १९ मार्च २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना निलंबित केले होते. त्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी आजरा ग्रामीण पाणीपुरवठ्याकडे नेमणूक केली, पण एकाच जागेवर शरद पाटील व शब्बीर शेख यांची नेमणूक केल्याने उपअभियंतांपुढे पेच निर्माण झाला आहे. दोघांपैकी कोणाची नेमणूक करावी, याबाबत उपअभियंत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या या ठरलेल्या असल्या तरी त्यातून त्यांची गैरसोय होऊन कामावर परिणाम होणार नाही, याची दक्षता जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे गरजेचे आहे, पण अधिकारी आपल्या ‘सोयी’साठी कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या बदल्या करण्यातच धन्यता मानत असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.आजरा पाणीपुरवठा विभागाने मागितले मार्गदर्शननेमके हजर कोणाला करून घ्यायचे, असा उपअभियंता यांना पडला पेच कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता
एकाच पदावर केल्या दोघांच्या नियुक्त्या
By admin | Updated: July 26, 2016 00:20 IST