कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा यंदाही होर्डिंगमुक्त करण्याचे आवाहन श्री रेणुका देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. १३) ही यात्रा होणार आहे. सौंदत्ती यात्रेनंतर आठ दिवसांनी ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा साजरी केली जाते. यादिवशी देवीची सालंकृत पूजा, आरती केली जाते. मेथीची भाजी, वडी, वरण, वांग, भाकरी अंबील, असा नैवेद्य दाखविला जातो. अलीकडे या यात्रेच्या निमित्ताने स्वागत व शुभेच्छा फलक लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फलकाच्या या गर्दीमुळे यात्रा परिसराच्या सौंदर्याला बाधा येते. शिवाय भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे जिकिरीचे जाते. त्यामुळे स्वागत कमान व शुभेच्छा फलक लावू नयेत. राजारामपूरी , राजवाडा पोलीस स्टेशन व महापालिकेला होर्डिंगमुक्त यात्रा मोहिमेस सहकार्य करावे व मागील वर्षीप्रमाणेच यंदाही होर्डिंगमुक्त यात्रा व्हावी, अशी अपेक्षा समितीने पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान यात्रेची तयारी सुरू असून, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र मंडप रांगा उभारण्यात येणार आहेत. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेवेळी मौल्यवान दागिने टाळावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. अन्नाची नासाडी टाळावीदेवीला नैवेद्य दाखविण्याची पद्धत असल्याने या दिवशी अन्नाची मोठी नासाडी होते. मात्र, गेल्या वर्षीपासून मंदिरातील पुजारी, जोगती व स्वयंसेवक योग्य नियोजन करून नैवेद्याची सांडलवंड होवू नये, यासाठी जातीने प्रयत्न करीत आहेत. काही भाविक कोरडा शिधा देण्याची सुचना करतात. मात्र, केवळ नैवेद्य देणे एवढाच हेतू यात्रेमागे नाही, तर सहभोजनाचा आनंदही लुटला जातो. त्यामुळे भाविकांनीदेखील अन्नाची नासाडी होऊ नये, यासाठी समितीला सहकार्य करावे, असे आवाहन पुजारी सुनील मेढे यांनी केले आहे.
होर्डिंगमुक्त अंबील यात्रेचे आवाहन
By admin | Updated: December 9, 2014 23:54 IST