कोल्हापूर : उठसूट प्रतिक्रिया देणारे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्या आजारपणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या जिंदालच्या बाबतीत मूग गिळून का गप्प बसले आहेत, अशी विचारणा करत दोन दिवसात माफी मागा नाही तर मोठी किंमत चुकवण्यास सज्ज राहा, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला.
मुश्रीफ म्हणाले, एका बाजूला पवार यांच्याविषयी चांगले बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची बदनामी करायची, अशी दुहेरी रणनिती अवलंबली जात आहे. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालणे भाजपला शोभत नाही.
मुश्रीफ म्हणाले, परमवीर सिंग व सचिन वाझे यांच्याबाबतीतही भाजपची दुहेरी भूमिका दिसत आहे. वाझे यांना फडणवीस यांचेच बळ मिळत राहिले आहे, निलंबित केले असतानाही त्यांनीच सेवेत घेतले. राजकीय पाठबळ नसते तर एका साध्या अधिकाऱ्याकडे इतक्या अलिशान गाड्या कशा काय आल्या असत्या, अशी विचारणा करुन याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके कुणी आणि का ठेवली, मनसुख हिरेन यांचा खून कुणी कशासाठी केला, याच्यामागचा मास्टर माईंड कोण आहे, याची सखोल चौकशी व्हायलाच हवी.