कोल्हापूर : शहरात संचारबंदी असतानाही अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲंटीजन टेस्ट करण्याची सूचना प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी दिला होता. त्यानुसार शनिवारी बिंदू चौकात विनामास्क, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या ५१ नागरिकांची रॅपिड ॲंटीजन टेस्ट करण्यात आली. मात्र, हे तपासणी केलेले नागरिक सुदैवाने निगेटिव्ह आले.
गेल्या तीन दिवसापासून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी सुद्धा शहरात अत्यावश्यक कामाचे नावाखाली नागरिक बाहेर पडून गर्दी करत आहेत. दुकान, बँक, भाजीमार्केट येथे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका लक्षात घेता शहरात मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड ॲंटीजन (कोविड) टेस्ट करण्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच बिंदू चौकात महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले. त्यात बिंदू चौक येथे ५१ महिला, पुरुष विनामास्क, सोशल डिस्टंन्स न पाळता फिरत होते. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही टेस्ट घेतल्यानंतर सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले. यात जर हे नागरिक पाॅझिटिव्ह आले असते तर त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये केली जाणार होती.